Pune metro news:पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी मोठी बातमी आहे! माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८२% काम पूर्ण झाले असून, ऑक्टोबर 2025 पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
काय आहे माण-हिंजवडी मेट्रो प्रकल्प?
हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारला जात आहे. सुरुवातीला ठेकेदाराकडून झालेल्या विलंबामुळे पीएमआरडीएने दंडात्मक कारवाईचा इशारा देत सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, जुलैपासून कामाला वेग आला असून आता मेट्रो पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने जात आहे.
कोणत्या भागात काम सुरू आहे?
बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांवरील काम अद्याप बाकी आहे. ११ स्थानकांवरील महत्त्वाची कामे सुरू असून अंतिम टप्प्यात आहेत. पुणे-बंगळुरू महामार्ग व मुळा नदीवरील उन्नत मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एक किलोमीटर वायडक्टचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
मेट्रो सुरू होण्यासाठी पुढील प्रक्रिया
उर्वरित स्थानकांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर ट्रायल रन घेतली जाईल. मार्गावरील सुरक्षा तपासणी पूर्ण होईल. सर्व तांत्रिक बाबींची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये मेट्रो सेवा सुरू केली जाईल.
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
८,३१३ कोटी रुपये – प्रस्तावित खर्च
२३.३ किमी – मेट्रो मार्गाचे एकूण अंतर
२३ स्थानके – संपूर्ण मार्गावरील स्थानकांची संख्या
१२ स्थानके पूर्ण – आधीच तयार झालेल्या स्थानकांची संख्या
प्रवाशांसाठी दिलासा!
माण-हिंजवडी हा आयटी हब असल्याने लाखो प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा हा तिसरा मेट्रो मार्ग वाहतूक कोंडी कमी करून जलद आणि सोयीस्कर प्रवास देणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे!