पुणे : आपल्या रोजच्या आहारात असलेल्या भाजीपाल्यात किती प्रमाणात रसायने आहेत? आपण खात असलेले अन्न खरंच सुरक्षित आहे का? यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवण्यासाठी पुण्यात पहिल्यांदाच ‘रासायनिक अवशेषमुक्त शाश्वत शेती प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने हे अनोखे प्रदर्शन भरवले जात आहे.
‘फॅमिली फार्मर’ संकल्पना – नव्या युगातील क्रांती!
जसे प्रत्येक कुटुंबासाठी ‘फॅमिली डॉक्टर’ असतो तसेच आपल्या कुटुंबासाठी ‘फॅमिली फार्मर’ का असू नये? रोज आरोग्यासाठी आपण डॉक्टरकडे पैसे खर्च करतो, मग सुरक्षित आणि रसायनमुक्त अन्नासाठी थेट शेतकऱ्यांना पैसे देण्याची संकल्पना का नाही? या विचारधारेभोवती हे संपूर्ण प्रदर्शन केंद्रित असेल.
या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट काय?
- शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रेरित करणे.
- सेंद्रिय आणि रेसिड्यू फ्री शेतीसाठी आवश्यक ज्ञान व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
- नागरीकांमध्ये सुरक्षित, केमिकलमुक्त आणि आरोग्यदायी अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे.
- शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी.
प्रदर्शनात काय पाहायला मिळणार?
- ५० हून अधिक प्रकारच्या रेसिड्यू फ्री शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक.
- हायटेक शेती, हायड्रोपोनिक शेती, एरोफोनिक शेती, नर्सरी तंत्रज्ञान.
- कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांनी विकसित केलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली.
- जैविक शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, गांडूळ खत, बायोचार, कंपोस्ट खताचे प्रात्यक्षिक.
- ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शेती तंत्रज्ञान.
विशेष आकर्षण – रानभाज्या महोत्सव आणि नवउद्योजकांसाठी मंच!
या प्रदर्शनात गावरान आणि देशी रानभाज्यांचे खास प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याशिवाय, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन्मानित केलेल्या ‘कृषीभूषण’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
प्रदर्शन कधी आणि कुठे?
हे खास प्रदर्शन पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ मार्च ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. पुणेकरांसाठी आणि शेतीशी संबंधित नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
शेतीत नवा विचार, आरोग्यासाठी नवी सुरुवात!
हे प्रदर्शन केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर प्रत्येक नागरीकासाठी जागरूकता निर्माण करणारे असेल. आपल्या आहारात येणाऱ्या अन्नधान्याची शुद्धता तपासण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणूनच या प्रदर्शनाला भेट देऊन, शाश्वत शेतीबद्दल अधिक माहिती मिळवा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करा! 🚜🌱