Pune news : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता पुणे शहरात अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १० पेक्षा जास्त चाकी वाहने, कंटेनर, ट्रेलर, बल्कर आणि मल्टी ॲक्सल वाहने यांच्यावर लागू असेल. सहा ते दहा चाकी ट्रक आणि टेम्पो यांना मात्र रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठराविक मार्गांवर परवानगी असेल.
वाहतूक पोलिसांचा नवा आदेश
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हा आदेश लागू केला असून, पुणे-बंगळूर महामार्ग वगळता शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. यासाठी काही प्रमुख मार्ग ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मार्गांवरून वाहनांना प्रवेश घ्यायचा असल्यास ४८ तास आधी वाहतूक विभागाकडे परवानगी घ्यावी लागेल.
अत्यावश्यक वाहनांसाठी ठराविक मार्गच खुले
अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या अवजड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच ठराविक मार्गांनी प्रवेश दिला जाईल. नगर रस्ता, वाघोली, खराडी बाह्यवळण मार्ग, गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, चंद्रमा चौक, पोल्ट्री चौक, हॅरिस पूल या मार्गांनीच वाहनांना जाण्यास मुभा असेल.
ही आहेत रेड झोन क्षेत्रे
खालील मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णतः बंदी असेल –
🔴 नगर रस्ता – विमाननगर चौक ते दत्त मंदिर चौक, शास्त्रीनगर चौक ते कल्याणीनगर, पर्णकुटी चौक ते कोरेगाव पार्क, वडगाव शेरी ते बिशप शाळा.
🔴 जुना मुंबई-पुणे रस्ता – पाटील इस्टेट ते शिवाजीनगर अभियांत्रिकी चौक.
🔴 गणेशखिंड रस्ता – ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ, औंध परिहार चौक.
🔴 बाणेर रस्ता – राधा चौक ते बाणेर.
🔴 सिंहगड रस्ता – राजाराम पूल ते स्वारगेट.
🔴 सातारा रस्ता – मार्केट यार्ड ते स्वारगेट, दांडेकर पूल ते शास्त्री रस्ता.
🔴 सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज चौक ते टिंबर मार्केट, स्वारगेट, गोळीबार मैदान, भैरोबा नाला चौक, रामटेकडी चौक.
🔴 कोंढवा मार्ग – एनआयबीएम रोड, लुल्लानगर चौक.
वाहतूक पोलिसांचे वाहनचालकांना आवाहन
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना ठरवलेल्या मार्गांचा वापर करावा आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
🚛 पुणेकरांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल आणि वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. 🚦