पुणे – पत्नी आणि मुलाच्या पोटगीसाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने पतीला अखेर महिनाभरासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार ७.९५ लाख रुपये थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पतीकडून पोटगी थकलेली!
पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत २०२१ मध्ये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, पतीने न्यायालयीन सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने २३ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने एकतर्फी निर्णय घेतला. या आदेशानुसार पतीला पत्नीला १५ हजार रुपये, मुलासाठी ५ हजार रुपये आणि घरभाड्यासाठी ५ हजार रुपये असे एकूण २५ हजार रुपये प्रतिमाह पोटगी देण्याचे निर्देश दिले होते.
७.९५ लाखांची थकबाकी!
पतीने न्यायालयाचा आदेश पाळला नाही आणि तो पैसे भरत नसल्यामुळे पत्नीने ॲड. ऋतुराज पासलकर, ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. प्रतीक पाटील यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. पतीने पत्नी आणि मुलाला आर्थिक संकटात टाकल्याचे स्पष्ट होताच, कोर्टाने कठोर निर्णय घेतला.
महिनाभराची शिक्षा!
पत्नीच्या वकिलांनी युक्तिवाद करत पतीने न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याला कारागृहात पाठवण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पतीला एक महिना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
स्त्रीसक्षमीकरणाची गरज!
हा प्रकार म्हणजे न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतींसाठी धडा असून, महिलांनी अशा परिस्थितीत न्यायालयाची मदत घ्यावी, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी दिला आहे.