पुणे, 11 फेब्रुवारी २०२५ – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA अंतर्गत परवडणाऱ्या घरांची सोडत बुधवारी (१२ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या सोडतीसाठी ३,२५६ अर्जदार पात्र ठरले आहेत.
PMRDAच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. पेठ क्र. १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रकारातील ४७ सदनिका आणि LIG (२ BHK) प्रकारातील ६१४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच, पेठ क्र. ३०-३२ मध्ये EWS (१ RK) प्रकारातील ३४७ सदनिका व LIG (१ BHK) प्रकारातील ३२९ सदनिका अशा एकूण १,३३७ सदनिकांची सोडत होणार आहे.
या योजनेसाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३,२७१ अर्जदारांनी अर्ज सादर केले होते, त्यातील १५ अर्जदार अपात्र ठरले, तर उर्वरित ३,२५६ अर्जदार अंतिम पात्र ठरले. ही सोडत आधी २२ जानेवारी रोजी नियोजित होती, परंतु प्रशासकीय कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
सोडतीचा कार्यक्रम कसा होणार?
सोडतीचा मुख्य कार्यक्रम मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
पुण्यातील अर्जदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, PMRDA कार्यालय, आकुर्डी येथे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अर्जदारांनी PMRDA कार्यालय, आकुर्डी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
गृहसंपादनाचा सुवर्णसंधी
PMRDA अंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढल्याने मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांना घर घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता असून, सोडतीचा निकाल लवकरच जाहीर होईल.