Viman Nagar to Kharadi Check Post Flyover: पुणे, १३ फेब्रुवारी २०२५ – पुणे-नगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर विमान नगर येथील हयात हॉटेलपासून शिरूरपर्यंत उड्डाणपुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, अलीकडेच या उड्डाणपुलाच्या लांबीमध्ये कपात करण्याच्या हालचाली वेग घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरी भागातील चार किलोमीटरचा पट्टा वगळण्याचा विचार सुरू असल्याने या निर्णयाला स्थानिक स्तरावर विरोध होत आहे.
यासंदर्भात वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि मूळ प्रस्तावित उड्डाणपुलाच्या लांबीमध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली.
या बैठकीत आमदार पठारे यांनी अधिकृत निवेदन सादर करून, हयात हॉटेल, विमान नगर ते शिरूर हा प्रस्तावित उड्डाणपुलाचा संपूर्ण भाग कायम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “विमान नगर ते खांडवे नगर दरम्यानच्या अनेक प्रमुख चौकांमध्ये सतत वाहतूक कोंडी होत आहे. खराडी आणि वाघोली येथे आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था, मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक समस्या अधिकच गंभीर होत आहे. विमान नगर येथील सीटीआर कंपनी चौक, टाटा गार्ड रूम, खराडी बायपास, जानक बाबा दर्गा जवळील चौक आणि खराडी चेक पोस्ट जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते. जर उड्डाणपुलाची लांबी कमी केली गेली, तर ही समस्या अधिक वाढेल.”
पठारे यांनी पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने तयार होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. मात्र, याची लांबी कमी करण्यामागील कोणतेही अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. लोकसभा सचिवालयात संसदीय अभ्यास सत्रादरम्यान गडकरी यांची भेट घेतल्यानंतर, आमदार पठारे यांनी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसेच, या प्रकल्पात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
News Title: No reduction in the length of the Viman Nagar to Kharadi Check Post flyover – MLA Bapusaheb Pathare’s demand to Union Minister Nitin Gadkari