पिंपरी: पुण्यातील चाकण येथे स्टीलच्या दुकानात झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्याचा कट हा मॅनेजरचा चुलत भाऊच रचला होता. कौटुंबिक वाद आणि ईर्ष्येमुळे त्याने १२ लाखांची सुपारी देऊन आपल्या चुलत भावावर हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे.
गोळीबार प्रकरणाचा संपूर्ण तपशील
२० जानेवारी रोजी महाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात ही घटना घडली. मॅनेजर अजय विक्रम सिंग (वय ३५, रा. हिंजवडी, पुणे) हे दुकानात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात अजय सिंग गंभीर जखमी झाले. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चुलत भावावर संशय कसा आला?
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. यातून अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम उर्फ चंदन अनंत सिंग (वय ४२, रा. मारुंजी, पुणे) याच्यावर संशय वाढला. मात्र, अजय सिंग यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले की त्यांचा चुलत भाऊ कधीच असे काही करू शकत नाही. तरीही पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि अखेर संग्राम सिंग याचा मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्टेशनबाहेर शोध घेत त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात आणखी कोण सामील?
पोलिस तपासात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यातील रोहित सुधन पांडे (वय २३, रा. उत्तर प्रदेश) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरोपींना शोधून काढले.
पोलिसांची मोठी कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकामध्ये पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पुढील तपास सुरू
या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक वेगाने तपास करत आहे. सुपारी कशी दिली गेली? हत्येचा कट कसा रचला गेला? याचा तपशीलवार तपास सुरू आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची मोठी जबाबदारी आहे की अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी कडक कारवाई करावी.