Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना थेट आर्थिक मदत मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवार यांनी सांगितलं की, “कालच मी ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.” लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. “एक रुपयात पीक विमा दिला, पण त्याचा गैरफायदा घेतला गेला. गायरान व शासकीय जमिनींवरही पीक विमा काढला गेला. योजनेचा योग्य लाभ घ्यायला हवा,” असंही ते म्हणाले.
सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
जालना जिल्ह्यातील परतूर येथील माजी आमदार सुरेश जेथलीया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
“आम्ही बेरजेचं राजकारण करतोय. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे आणि तोच वारसा आपण टिकवला पाहिजे. जातीय सलोखा राखला पाहिजे,” असं ते म्हणाले. स्थानिक नेत्यांना जास्त अधिकार देण्याचं त्यांनी संकेत दिले.
ब्रेकिंग न्यूजवर विश्वास ठेवू नका – अजित पवार
अजित पवार यांनी माध्यमांवरही टीका केली. “आज टीव्ही लावा, तर फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. पण यातून सामान्य जनतेच्या समस्या सुटत नाहीत,” असं ते म्हणाले.
“माझा राजकीय प्रवास १९९१ मध्ये सुरू झाला. मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील जिल्ह्यांचा अभ्यास करताना शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. आम्ही त्या सोडवण्यासाठी काम करत राहू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.