पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्यातील GBS रुग्णसंख्या २०३ वर
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत २०३ GBS रुग्ण आढळले आहेत. यातील १७६ जणांचे निदान झाले आहे. पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक असून, पुणे महापालिका क्षेत्रात ४१, नव्याने समाविष्ट गावांमध्ये ९४, पिंपरी-चिंचवडमध्ये २९, तर पुणे ग्रामीण भागात ३१ रुग्ण आहेत.
ICU आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची स्थिती चिंताजनक
राज्यात सध्या ५२ रुग्ण ICU मध्ये उपचार घेत असून, २० रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र, समाधानाची बाब म्हणजे १०९ रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत.
GBS मुळे पुण्यात सर्वाधिक मृत्यू
राज्यात GBS मुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ६ मृत्यू पुण्यात, १ पिंपरी-चिंचवडमध्ये, तर पहिला मृत्यू सोलापूरमध्ये झाला होता. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
वयोगटनुसार रुग्णसंख्या
- २० ते २९ वर्षे – ४४ रुग्ण
- ५० ते ५९ वर्षे – २९ रुग्ण
- ० ते ९ वर्षे – २४ रुग्ण
- १० ते १९ वर्षे – २४ रुग्ण
- ३० ते ३९ वर्षे – २४ रुग्ण
- ४० ते ४९ वर्षे – २७ रुग्ण
- ६० ते ६९ वर्षे – २१ रुग्ण
- ७० ते ७९ वर्षे – ६ रुग्ण
- ८० ते ८९ वर्षे – ४ रुग्ण
GBS म्हणजे काय?
गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) हा स्नायूंवर परिणाम करणारा दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती न्यूरोलॉजिकल पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे अशक्तपणा आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो.
GBS प्रतिबंधासाठी प्रशासन अलर्ट
GBS चा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. पुण्यातील महापालिका प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद लक्षणांची त्वरित नोंद घ्यावी आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.