पुणे : शहरात एटीएम फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असून, शिवाजीनगर परिसरात घडलेल्या एका घटनेत चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून तब्बल ८० हजार रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
दौंड शहरातील एक महिला कामानिमित्त पुण्यात आली होती. तिने शिवाजीनगरमधील वीर चापेकर चौकातील एका एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी प्रवेश केला. यावेळी एका चोरट्याने तिच्या मदतीचा बहाणा करत एटीएम कार्ड आणि पिन कोड घेतला. त्यानंतर त्याच्याकडील अन्य एका कार्डचा वापर करून व्यवहार करायचा प्रयत्न केला. काही वेळाने त्याने महिलेच्या हातात एक वेगळे कार्ड देत, एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले.
महिलेने कार्ड घेत बाहेर पडल्यानंतर चोरट्याने तिचे खरे एटीएम कार्ड वापरून खात्यातून ८० हजार रुपये काढले. काही वेळाने पैसे काढल्याचा मेसेज आल्यावर महिलेला फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आणि तिने त्वरित शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मदतीसाठी एटीएममध्ये आलेल्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी अधिक सतर्क राहावे आणि कोणालाही आपले कार्ड व पिन कोड देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
News Title: New type of ATM fraud in Pune, woman robbed of 80 thousand