पुणे: माई मंगेशकर रुग्णालयाजवळ एका नागरिकाला गाडी आडवी लावून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत निरंजन माने (वय 53) यांना त्यांच्या कारमध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून नेण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली असून, लुटारू दोघे दुचाकीवरून आले होते.
निरंजन माने गणपती माथ्यावरून दर्शन घेऊन घरी परतत असताना या लुटारूंनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्या खिशातील रोख रक्कम लुटली. घटनेनंतर माने यांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात प्रयत्न केला, परंतु त्यांना पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांनी “ड्युटी बदलण्याची वेळ झाली आहे, उद्या या” असे सांगून तक्रार नोंदवण्यास नकार दिला.
दरम्यान, या घटनेचा CCTV फुटेज समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या फुटेजमुळे लुटारूंची ओळख पटण्यास मदत होऊ शकते, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत.
या घटनेमुळे पोलिसांचा निष्काळजीपणा आणि शहरातील गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात येत आहे. प्रशासन यावर काय कारवाई करणार, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. शहरातील सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांनी गंभीर भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिक संघटनांकडून करण्यात आली आहे.